पालकांनो,...


प्रेमाचं पांघरूण घाला
पण, दृष्टीचं काढा..
अळीचा कोष
अळीनेच फोडावा
प्रेमापोटी, मदत म्हणून
दुसर्‍या कोणी फोडला
तर...
आतलं फुलपाखरू उडायचं नाही!

जहाज बंदरावर सर्वाधिक सुरक्षीत असतं.
मात्र कायम बंदरामध्येच
नांगरून ठेवण्यासाठी
ते बांधलेलं नसतं.
उधाणलेल्या समुद्रात
वादळाशी झुंजण्यातच
त्याची खरी सार्थकता असते.

शाळेत सोडण्यापासून,
प्रोजेक्ट करण्यापर्यंत
मुलगा/मुलगी शोधण्यापासून
पुढं, त्यांची मुलं सांभाळण्यापर्यंत
मुलांच्या सगळ्याच लढाया
आपणच लढू नये.

चटके बसल्याशिवाय
अपमान पचविल्याशिवाय
वाढ अपुरीच राहते.
आयत्या सुखाला किंमत नसते.
स्वकष्टाचीच भाकरी गोड लागते.

शिक्षण द्या, संस्कार द्या...
अडचणीला आधार द्या.
पण आयुष्यभर मुलं बसून खातील
इतकं मागे ठेऊ नका.
अती प्रेम पंगू बनविते
खूप पाणी रोप कुजविते.

या कवितेतील दुसरे 'अख्खे' कडवे माझे आहे (जे एका इंग्रजी वचनावरून बेतलेले आहे). उर्वरीत कविता ही जळगाव येथील विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेच्या प्रगती-पुस्तकावरून ढापलेली आहे.

'देखणे ते चेहरे, जे प्रांजळाचे आरसे
गोरटे की सावळे या मोल नाही फारसे'

या काव्यपंक्तीप्रमाणे 'सई' देखणी असेल. ('सई' हे या लेखनप्रपंचातील माझ्या सहचरीचं गृहीत धरलेलं नाव !) आमचा प्रेमविवाह होईल की ठरवून लग्न होईल? खरं तर दोन्हीही नाही. कारण बहुतांश प्रेमविवाह हे परस्परांच्या चकाकणार्‍या बाजुंवर भाळून केले जातात. अंधारलेली दुसरी बाजू लग्नानंतरच दिसते. आणि ठरवून केलेल्या बहुतांश विवाहांत व्यावहारिक गोष्टींवरच प्रामुख्याने भर दिला जातो. आमचा विवाह हा 'परिचय-विवाह' असेल. आमची पुर्वीची ओळख नसल्यास मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाऐवजी परस्परांचे फोटो, कौटुंबिक-आर्थिक परिस्थिती इत्यादी जुजबी माहितीवरून प्राथमिक पसंती होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष भेटींमधून परस्परांचा संपूर्ण परिचय करून घेऊन, आम्ही एकमेकांना अनुरूप आहोत, अशी खात्री पटल्यानंतरच विवाहाचा निर्णय घेतला जाईल. जन्मपत्रिकेतले गुण जुळतात की नाही, हे पाहण्याऐवजी स्वभावातले गुण-अवगुण जुळतात की नाही, याची पडताळणी केली जाईल. आमच्या आवडी-निवडी, आमची विचारसरणी, आमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जुळतो आहे, हे लक्षात आल्यानंतर साहजिकच आमच्या मनात एकमेकांविषयी आदर, आपुलकी, प्रेम उत्पन्न होईल. 'प्रेम ही निव्वळ भावना नाही, तर दुसर्‍याच्या हिताकरिता, विकासाकरिता केलेले निरपेक्ष प्रयत्‍न म्हणजे प्रेम' ही प्रेमाची कृतिशील व्याख्या आम्ही स्विकारलेली असेल. सई आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असेल. किमान स्वतःच्या पायावर उभी राहण्यास समर्थ असेल. कारण दोन स्वतंत्र (Independant) माणसंच एकमेकांवर खरं प्रेम करू शकतात. नातं टिकवणं हा त्यांचा नाइलाज नसतो.

आमच्या विवाहाच्या निमंत्रणपत्रातील मजकूर काहीसा असा असेल - 'स.न.वि.वि... आम्ही उभयता वडील मंडळींच्या आशीर्वादानं गृहस्थाश्रमात प्रवेश करत आहोत. या कार्यात सभागृह, भोजन, कपडे, दागिने, देवघेव, प्रवास इत्यादींवर होणारा अनावश्यक खर्च टाळून तो पैसा सत्कारणी लावण्याचा आमचा मानस आहे. लग्नाला साधारणतः लागणार्‍या एकूण खर्चाच्या अर्धी-अर्धी रक्कम वधू-वर पक्षानं उभारून समाजहिताच्या कार्यासाठी देण्याचं ठरवलं आहे. या विवाहाच्या निमित्तानं प्रवास, आहेर, खरेदी इत्यादींवर आपला जो पैसा एरवी खर्च झाला असता, तो या सत्कार्यासाठी देणगी म्हणून आपण द्यावा, ही आपणास विनंती आहे... विनीत...'

लग्नानंतर आमच्या सहजीवनाला सुरूवात होईल. मला वाटतं की, पती-पत्‍नीचं नातं हे रेल्वेच्या रुळांसारखं असावं. दोन्ही रूळ एकमेकांना शेवटपर्यंत साथ देतात. प्रवासात कितीही चढ-उतार आणि वळणं आली तरी एकमेकांपासून ते थोडेही दुरावत नाहीत. मात्र एकमेकांत ते कधी मिसळत, गुंततही नाहीत. एकमेकांतलं अंतर, वेगळेपण, स्वतंत्र अस्तित्व कायम राखून असतात. त्यामुळेच गाडी रुळावरून घसरत नाही.

सईला मी तीच्या हक्काचा 'चौथा कमरा (कोपरा)' आनंदाने देईन आणि माझाही स्वतःचा असा एक कोपरा राखेन. सईनं पतीला परमेश्वर न मानता मित्र मानावं अशी माझी अपेक्षा असेल. तिची राहणी कशी असेल, हे तिचं तीच ठरवेल. मात्र तिला पाहताच तिचं 'दर्शन' घडावं, 'प्रदर्शन' पाहिल्यासारखं वाटू नये, एवढीच माझी अपेक्षा असेल. हॉल असो, किचन असो वा बेडरूम असो, आपलंच म्हणणं खरं करण्याऐवजी परस्परांच्या अपेक्षापूर्तीचा आमचा प्रयत्‍न असेल. जे मिळालेलं नाही, ते योग्य त्या मार्गाने मिळवण्यासाठी आम्ही नेटाने प्रयत्‍न करू. मात्र, जे मिळालंय त्यात समाधानी राहू. आम्ही पैसे कमावणारी यंत्रं (Money Making Machines) नाही, तर सर्व स्तरांवर संपन्न आणि कृतार्थ जीवन जगू इच्छिणारी माणसं आहोत, ही जाणीव सदैव जागृत ठेवू. लोकांना हेवा वाटावा अशा वस्तू आमच्या घरात असतील-नसतील, परंतु लोकांनी स्फूर्ती घ्यावी अशी माणसं आमच्या कुटुंबात असावीत, ही आमची इच्छा आणि तसा प्रयत्‍न असेल.

संगीताच्या मैफलीत प्रत्येक वाद्याची जातकुळी वेगळी, म्हणून स्थानही वेगळं असतं. वादकांनी आपापल्या वाद्यांनी मैफलीत रंग भरायचे असतात. मात्र प्रत्येकानं जर आपल्या वाद्यानं इतरांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्‍न केला तर संगीताच्या मैफलीचं रूपांतर बेसूर अन् बेताल गोंगाटात व्हायला वेळ लागत नाही. कुटुंबाचंही असंच असतं. प्रत्येकानं कुटुंबातील आपली भूमिका जबाबदारीनं आणि संयमानं बजावली तर कुटुंब केवळ कुटुंब राहत नाही, तर ती संगीताची एक सुरेल मैफल बनते. आणि अशी सुरेल मैफल सजवणं हेच आमचं स्वप्न असेल.

नमस्कार

नमस्कार मित्रांनो, मी आपल्याला आता नेहमीच इथं भेटणार आहे. तुमच्याशी हितगुज साधणार आहे. माझे विचार, भावना तुमच्याशी शेयर करणार आहे. तुम्हालाही आवडेल न मला इथं नेहमी भेटायला ? तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया अगदी बिनधास्तपणे माझ्याशी, सर्वांशी शेयर करा. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटू या.